श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यात्तील वाहनांचा अपघात; नांदेडमध्ये घडली घटना..

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे निघाले होते. ‘शिव संवाद दौऱ्या’निमित्त नायगाव येथे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी ते जात होते.
दरम्यान, शहरातून ताफा पुढे जात असताना साठे चौक येथे ताफ्यातील एका वाहनासमोर अचानक एक व्यक्ती आल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावला. समोरील वाहनाने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागील तीन वाहने एकमेकांवर आदळली.या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली आणि ताफा पुढील प्रवासासाठी रवाना झाला.
नांदेड दौऱ्यावर असताना खासदार श्रीकांत शिंदेंनी नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघांतील आढावा बैठका घेत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला. या दौऱ्यादरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अभियान या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, प्रत्येक गाव, वाडी आणि घराघरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरावे. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे, ही ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे श्रीकांत शिंदेंनी सांगितले.



