पुणे

दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा; शेअर बाजारात गुंत‌वणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गणेश मुरलीधर कांबळे (वय ४७), शुभांगी गणेश कांबळे (वय ४०), रेखा संतोष अनगळे (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभगणेश एंटरप्रायजेस या कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपी कांबळे, अनगळे यांनी तक्रारदार तरुणाला दाखविले होते.
तरुणाने सुरुवातीला १९ लाख ४९ हजार रुपये गुंतवले. त्याला आरोपींनी एक लाख ४९ हजार रुपये परताव्यापोटी दिले. त्यानंतर आरोपींनी त्याला परतावा देणे बंद केले. त्यामुळे तरुणाने गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. आरोपींनी रक्कम परत करतो, असे सांगून तरुणाला हमीपत्र दिले, तसेच दोन धनादेश दिले. खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटले नाहीत.
त्यानंतर तरुणाने आरोपी गणेश कांबळेशी संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तरुण कांबळेच्या घरी गेला. तेव्हा कांबळे घर बंद करुन पसार झाल्याची माहिती मिळाली. तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button