९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई!
पडेगाव परिसरात झालेली ही कारवाई शहरातील सर्वात मोठी ड्रग्ज कारवाई मानली जात आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्य प्रदेशच्या आंतरराज्यीय टोळीवर पडेगावात रविवारी (दि.१) छापा टाकून ९० लाख ५९ हजार रुपये किंमतीचे ५०३.३३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी ११ आरोपींविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज झहीर खान (३३, रा. देवास, मध्य प्रदेश), हर्ष ओमप्रकाश शर्मा (२४, रा. मुसाखेडी, इंदूर, मध्य प्रदेश), आनंद देविलाल प्रजापत (२४, रा. देवास, मध्य प्रदेश), शेख अरबाज शेख इद्रिस (२४, रा. सिल्क मिल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), नदिम शेख अलिम शेख (२२, रा. पडेगाव, संभाजीनगर), अजहर अबुबकर शेख (२८, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड), फैजान मुख्तार शेख (२१, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव), सोहेल, अयान, सागर, अरबाज व त्यांच्या १५ ते २० हस्तकांचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत आदींनी दिली.आरोपी अरबाज खान याच्याकडे एमडी बाबत चौकशी केली असता, तो युरिया असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तो म्हणाला, अरबाज शेख याने मला १५ ते २० हजारांचा बोगस मालविक्री करुन गंडा घातला होता. त्यामुळे मी त्याला एमडी म्हणून हा युरिया देणार होतो, अशी थाप त्याने मारली. मात्र फॉरेन्सिक तपासणीत तो पदार्थ एमडी असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्य आरोपी अरबाज झहीर खान याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता, हर्ष शर्मा, आनंद प्रजापत या मित्रांना घेवून छत्रपती संभाजीनगरातील शेख अरबाज शेख इद्रिस यास विक्रीसाठी ड्रग्ज आणल्याचे त्याने सांगितले. शेख अरबाज यांच्याकडे विचारपूस केली असता, शेख नदिम व शेख अजहर ऊर्फ अज्जू शेख व त्यांचे मित्र ड्रग्ज पावडर विकत घेणार होते. त्यासाठी त्यांना सोबत आणल्याचे उत्तर त्याने दिले. शेख अरबाज याच्याकडील तपासात वरील दोघांशिवाय सोहेल, अयान, सागर व अरबाज यांनी विक्रीसाठी हा साठा मागविल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी १५ ते २० जणांच्या हस्तकांसह संघटित टोळी बनविली असल्याचे स्पष्ट झाले.
एमडीची बाजारभावाने किंमत १८ ते २० हजार रुपये प्रति ग्रॅम आहे. आरोपी ५-६ हजारांना खरेदी करून दुप्पट-तिप्पट दराने विक्री करत होते.
शेख अरबाज याला समोरील व्यक्तीने १०० ग्रॅम एमडी मागितले होते. पैसा कमाविण्याच्या नादात शेख अरबाज याने ५०० ग्रॅम एमडी मागवले आणली फसला.पुरवठादार मध्यप्रदेशचा अरबाज खान हा डिलर अरबाज शेख याचा चुलत भाऊ आहे. तसेच अरबाज खान याची जिन्सी परिसरात सासुरवाडी आहे. तो यापूर्वीही अनेक वेळा सासुरवाडीत आला होता, माञ पहिल्यावेळी एमडी घेवून तो शहरात आला आणि पोलिसांच्या हाती लागला. अरबाज खान हा सराईत आहे. भोपाळ व इंदौरसह इतर शहरात देखील ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.



