धारावी, कुर्ला परिसरात एक कोटीचा एमडी साठा जप्त; एमडी विकणाऱ्या ड्रग्ज माफियांना बेडय़ा

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (मुंबई) : धारावी, कुर्ला व आसपासच्या परिसरात एमडीची तस्करी व विक्री करणाऱ्या दोघा ड्रग्ज माफियांना अमली पदार्थविरोधा कक्षाने बेडय़ा ठोकल्या. त्या दोघांकडे मिळून एक कोटी एक लाख रुपये किमतीचा ५०५ ग्रॅम एमडीचा साठा मिळाला. प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चिकणे, पालवे व पथक ड्रग्ज माफियांचा शोध घेत असताना घाटकोपर पूर्वेकडील खोकानी लेन रतनशी खिमजी वाडी या परिसरात एक ड्रग्ज माफिया एमडीचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या परिसरात सापळा लावला. मो एजाज मो याकूब शेख हा तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १०० ग्रॅम एमडी साठा मिळाला. सदर एमडीबाबत विचारले असता नालासोपारा येथे राहणाऱ्या नायजेरियन ड्रग्ज माफिया ब्राईट ओलिव्हर याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले.
मग पोलीस पथकाने नालासोपारा गाठून ड्रग्ज पुरविणाऱ्या ओलिव्हरला उचलले. तेव्हा त्याच्या जवळ ४०५ ग्रॅम एमडीचा साठा मिळून आला. अशा प्रकारे दोघा ड्रग्ज माफियांना पकडून ५०५ ग्रॅम वजनाचा व एक कोटी एक लाख रुपये किमतीचा एमडी साठा पोलिसांनी हस्तगत केला. अटक करून त्या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शेख याच्या विरोधात एनसीबी मुंबई तसेच पायधुनी व साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.



