मुंबई पोलिसांना मिळणार बॉडी-वॉर्न कॅमेरे…
मुंबई पोलिसांकडून एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. लवकरच इमर्जन्सी कॉलवर सर्वप्रथम पोहोचणाऱ्या पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज उपकरणे देण्याची तयारी सुरू आहे.

पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणारे हे कॅमेरे त्यांच्या कामकाजाचे थेट रेकॉर्डिंग करणार असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीत अधिक पारदर्शकता येणार आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये अशा प्रकारचे बॉडी कॅमेरे वापरले जातात आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांमध्येही ही प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे घटनास्थळी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणे शक्य होणार आहे.
अलीकडच्या काळात पोलीस आणि वाहतूक पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. अनेकदा अशा घटनांमध्ये नेमके काय घडले यावर वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी आणि घटनांची अचूक नोंद ठेवण्यासाठी राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध होईल, ज्यामुळे वादग्रस्त परिस्थितीत सत्य परिस्थिती समजणे अधिक सोपे होणार आहे. सध्या सुरुवातीच्या टप्प्यात २३० बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांची खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. भविष्यात या कॅमेऱ्यांची संख्या वाढवून अधिकाधिक पोलिसांना ही सुविधा दिली जाणार आहे.
- आपला डेटा सुरक्षा ढांचा अधिक मजबूत होणार आहे.
- मुंबईमध्ये १,१५० एआई-सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत
- यामध्ये ५०० विद्यमान युनिटमधील कॅमेरे अपग्रेड केले जाणार आहेत.
- अत्यावश्यक कॉलवर सर्वात आधी पोलीस कर्मचारी पोहोचतात. अशा स्थितीत परिस्थिती हाताळणे खूपच महत्त्वपूर्ण ठरते.
- बॉडी-वॉर्न कॅमेरे घटनेचे रेकॉर्डिंग करतात. यामुळे डिजिटल पुरावा तयार होतो.
- न्यायालयीन कारवाईवेळी अथवा अंतर्गत समीक्षेवेळी हे खूपच उपयुक्त ठरणार आहे.
- पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅमेऱ्यांतील रेकॉर्डिंगमधून स्थिती स्पष्ट होते, यामुळे वाद-विवादाची स्थिती कमी होते. यामुळे निष्पक्ष तपासही केला जाऊ शकतो. या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांचे वागणेही रेकॉर्ड होणार आहे. जर पोलीस कर्मचा-याच्या वर्तणुकीची तक्रार आली, तर रेकॉर्डिंगच्या आधारे त्याची सत्यता तपासली जाणार आहे.



